ती:
त्याला बाय करून बसमधे… तो पुढच्या सिग्नलला डावीकडे वळून झूऽऽऽम…
एकमेकांचे हात हातात घेऊन दोघंही शांत बसलो होतो. माझं
कुठे लक्ष होतं देव जाणे. कदाचित डोळे मिटूनही घेतले असतील मी. त्यानी
घामेजलेला त्याचा हात हातातून कधी सोडवून घेतला,
बॅगेतून रेड मार्कर कधी काढला आणि दुसर्या हाताने माझा हात अलगद पकडून… इतकं सुंदर चित्र कधी गोंदवलं… काही म्हणता काही कळलंच नाही. आणि तो ही अवलियाच! शांतपणे बसला माझी समाधी सुटण्याची वाट पहात. फुलांच्या दोन डहाळ्या, त्यावर छोटीशी नाजूक फुलं एकमेकांकडे बघणारी आणि एकूण आकार हार्ट-शेप्ड! वॉव!! त्यानंतर त्याच्या ग्रे डोळ्यांत खोलवर बघायची चव काही औरच होती. वेगळी मिठी मारायची गरजच भासली नाही मग!
बॅगेतून रेड मार्कर कधी काढला आणि दुसर्या हाताने माझा हात अलगद पकडून… इतकं सुंदर चित्र कधी गोंदवलं… काही म्हणता काही कळलंच नाही. आणि तो ही अवलियाच! शांतपणे बसला माझी समाधी सुटण्याची वाट पहात. फुलांच्या दोन डहाळ्या, त्यावर छोटीशी नाजूक फुलं एकमेकांकडे बघणारी आणि एकूण आकार हार्ट-शेप्ड! वॉव!! त्यानंतर त्याच्या ग्रे डोळ्यांत खोलवर बघायची चव काही औरच होती. वेगळी मिठी मारायची गरजच भासली नाही मग!
छ्या! परत एक समाधी लागण्यापासून कंडक्टरने वाचवलं,
स्टॉप आल्याचं ओरडून. काही खरं नव्हतं नाहीतर. आता हातावर म्हणजे अगदी समोर
आहे, तर्जनी आणि अंगठ्यामधल्या छोट्ट्याश्श्या त्रिकोणात! आईला दिसणारच
लगेच. तरी किती शहाणा आहे माझा मित्र… उगाच दंडावर वगैरे काढलं नाही… फक्त
त्या त्रिकोणात! आता आईला फारश्या माहित नसलेल्या मैत्रिणीचं नाव पुढे
करावं लागणार. नीट आठवून, घोकून ठेवते. नाहीतर रात्री बाबांनी विचारल्यावर
काहीतरी वेगळंच सांगायचे. पण का करायचा इतका खोटेपणा? काही वाईट तर केलेलं
नाहीये. शांत पसरलेल्या बीचवर थंड सावलीच्या आडोश्यातही एकमेकांचा हात
हातात घेऊन क्षितीजापार नजर फेकत बसायचा वेडेपणा आम्हीच करत असू. मग त्या
बिचार्या नाजूक फुलांसाठी कशाला हवाय खोटेपणा? नाही. हा खोटेपणा काही
लपवण्यासाठी नाहीये खरंतर. उग्गाच होणार्या नसत्या चौकश्यांसाठी आहे.
काहीतरी माहिती कानावर पडावी म्हणून… चित्राचं कौतुक तर नाहीच किंवा अशाच
चांगल्या मुलींमधे रहात जा हो असा छानसा सल्लाही नाही… उग्गाच चौकशी. की
पुसूनच टाकू? मुळीच नाही… आतातर हे जाईपर्यंत साबणही नाही लावायचा हाताला…
काळा पडला तरी चालेल! छे, असं कसं चालेल? तो ब्लड रेड मार्कर दिसेल तरी का
नीट मग माझ्या हातामागे? अशाने काढणार नाही तो चित्र मग…
घरी पोचून… आईला छानसं स्माईल देऊन सरळ खोलीत…
की पुढच्या वेळेस मानेवर काढायला सांगू. ते आडदांड
अमेरिकन बायकर्स गरूडाचा किंवा कवटीचा टॅटू काढतात तसं? पण त्यासाठी जागं
रहावं लागेल. तो सोबत असला की इतकं छान, हसरं आणि elevated वाटतं ना! खूप
सांभाळून ठेवावेसे वाटतात ते क्षण. बीचवर पोचेपोचेपर्यंत इतकी फास्ट चालवतो
बाईक… की वाटतं माझ्यापेक्षा तो बीच जास्त आवडतो त्याला… माझे केस अगदी
विस्कटून जातात… त्याच्या भाषेत मांजराच्या फेंदारलेल्या मिश्या… मग तो
स्वतःच ते नीट करतो. त्याचे नजर माझ्या केसांत आणि माझे डोळे त्याच्या
डोळ्यांच्या पाठलागात. उद्या अजून विस्कटते केस. मग माझ्या हाताला विळखा
घालून त्याची बोटं माझ्या बोटांत विणली जातात. घट्ट. त्याला बीच नाही; मीच
आवडते.
“काय गं आई? हाक मारलीस?”
“हो. अगं. भांडी घासून टाक तूच आज. बाई काही येत नाहीत
वाटतं आज. मी कपडे धुते. आज नेमके पडदे धुवायला काढले होते आणि मशीन
बिघडलं. आणि हो, कपबश्या सांभाळून.”
“हो गं आई. मी काय लहान आहे का आता.”
पटकन् कपडे बदलून ओट्याशी… नाहीतर कपडे का बदलले नाहीत म्हणून ओरडेल आई…
पुढचा अर्धा-पाऊण तास त्या लालेलाल फुलांवरून साबणाचं
पाणी वहात होतं… रंग, फुलं, डहाळ्या आणि तो हार्ट-शेप सगळंच हिरमुसलं. आणि
सर्वात जास्त मी. किती वेगळा होता हा लाल रंग. ना गुलाबाचा लाल, ना
त्याच्या बाईकचा लाल अगदी लाल बर्फगोळ्यासारखाही नाही… कदाचित थंडगार लाल
बर्फगोळ्यामुळे त्याच्या ओठांच्या झालेल्या रंगासारखा होता हा लाल रंग.
चित्र काढून झाल्यावर त्याने टेकवले असतील का हलकेच त्याचे ओठ त्यावर…
तो:
घरी येऊन फुल्ल पंख्याखाली पलंगावर लोळत
रोजच्या सारखंच आजही. बीचपर्यंत रंपाट पळवायची बाईक…
मग तिचे फेंदारलेले केस नीट करायचे… मग हातात हात… किती नाजूक आहे तिचा
हात… मस्त! पण तरीही काहीतरी वेगळं… रोज थोडं थोडं वेगळं वाटतं.
नेहमीसारखेच निवांत बसलो होतो. किती वेळ गेला कुणास ठाऊक पण क्षितीजावरची
जहाजं नीट दिसेनाशी झाली. बीचवर कडक ऊन पण आम्ही पूर्ण सावलीत होतो. आणि
तिच्या हातावर बारीकसा खेळकर कवडसा आला कुठूनसा… मी चमकून तिच्याकडे
पाहीलं. ती तिच्याच विश्वात हरवलेली. किती निश्चिंत असते ती माझ्यासोबत.
तिचे केसही उन्हात… पूर्ण चेहर्याला सोनेरी आऊटलाईन! पेन कधी काढलं काय
माहीत… थेट तिच्या हातापाशीच येऊन थांबलो. मग पेन सलग फिरत गेलं… स्वच्छंद.
आज कितीतरी दिवसांनी काढलं चित्र… तो हार्ट-शेप तर ती बोलली तेव्हा कळला!
ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत…
त्या सॉफ्ट पेन्सिल्स आणि चारकोल, कॅनव्हास शोधून काढतोच आता. पण
तिच्या डोळ्यातला निर्भेळ आनंद काढता येईल? हसरे ओठ काढता येतील पण
गालावरची छोटीशी खळी? रोज सकाळी सकाळी दिसल्यावर पटकन चुकून जाणारा हृदयाचा
ठोका??
हो. आलो… फोडतो नारळ…
बाईकवर फिरवायला हिच्याइतकी शहाणी मुलगी नसेल अजून कोणी. चौथ्यावरून
तिसर्यावर येऊन झपकन् ओव्हरटेक करून मग चौथ्यावर आरामात चालवण्यातली मजा
माझ्याइतकीच तीही घेते… घट्ट पकडून मला. केस उगाच फिस्कारत नाहीत तिचे!
कसली क्यूट दिसते केस फिस्कारल्यावर खरंतर. पण उगाच नजर नको लागायला कुणाची
म्हणून मग नीट करतो. तिच्या फिस्कारलेल्या केसांचं चित्र काढायचं तर
चारकोलच हवा. charcoal on canvas!!! काय विचार करत असेल असं क्षितीजापार
बघत? शांतपणा तर अगदी रंध्रारंध्रात भरला जातो तिच्या, हात माझ्या हातात
घट्ट आणि डोळ्यात… काहीतरी वेगळंच… आज तो हार्टशेप आहे असं सांगताना डोळे
भरून आल्यासारखे का वाटले तिचे. एखादा चुकार अश्रू सांभाळायला आवडलं असतं
मला आजची आठवण म्हणून… केस फिस्कारलेली ती, थोड्याशा पाणावलेल्या डोळ्यांनी
थेट डोळ्यात बघणारी, गार वार्यानं गाल लाल झालेली आणि हो, एका हातावर
फुलांचं हार्टशेप डिझाईन असलेली… done! या व्हॅलेंटाइन डे ला परत propose
करायचं… हे पोर्ट्रेट गिफ्ट करून.
तो: तुला प्रपोज करून आणि तू होकार देऊनही जुना झाला. सांग लग्न कधी करतेस…
…
…
…
…
…
ती: आत्ता. या क्षणी…
तो: नाही असं नाही. आईबाबांना घेऊन येतो उद्याच तुझ्या घरी…
…
…
ती: चालेल. खळी पाडून हसते
तो: आणि हो, हे… तुझं पोर्ट्रेट. फक्त तुझ्यासाठी!
-आल्हाद महाबळ
अरे पोरीला गोड खळी पडत असेल तर नाही ती म्हणाल्यावरही आम्ही स्केच/पोर्टेट काढून द्यायला तयार आहोत!!!
ReplyDeleteBTW .... बाईक कुठली वापरतोस? चौथ्यावरून तिसर्यावर येऊन झपकन् ओव्हरटेक करून मग चौथ्यावर आरामात चालवण्यातली मजा घेण्यासाठी?
:D :p
- सौरभ वैशंपायन.
चार गियरवाल्या सगळ्यांच बाईक्सवर असं करता येतं … बाईकवर हात तेवढा बसलेला पाहिजे मात्र…
Delete